हमारे उत्पाद
आमच्याकडे मी लहानपणापासून बघतोय, शैचाला जाण्याची परिस्थिती बिकट होती. शेताच्या कडेला, रस्त्याच्या कडेला लोक जायचे. घरातील महिलांना हा प्रश्न खूप अवघड होता. कापसे फाउंडेशनतर्फे वडगाव, भल्लेगावसारख्या वस्तीमध्ये सेप्टिक टँकसह उत्तम दर्जाचे शौचालये बांधून दिली गेली. सरकारी शौचालयापेक्षा ही शौचालये, चांगल्या दर्जाची आहेत.
- विजय धोंडीराम बर्वेग्रामस्थ, वडगाव
कापसे फाउंडेशनच्या माध्यमातून बाळकृष्ण कापसे यांनी वडगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला खूप मोठे योगदान दिलेले आहे. फाउंडेशनतर्फे संगणक कक्ष, शुद्ध पेयजल, विद्युत मोटारची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या, विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फाउंडेशनने जवळपास ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
- वसंत गजानन निगूहमुख्याध्यापक
आमचा हातमागाचा व्यवसाय २००३ पासून आम्ही करतो आहोत. २००३ मध्ये आम्ही कापसेंकडे शिकलो. २००५ ला आम्ही घरी हातमाग टाकला. रेशीम आणि डिझाइनही आम्हाला कापसेंनीच दिली. जसं काम वाढत गेलं, तसं हातमाग वाढवत गेलो. आज आम्ही दोघेही या कामात आहोत. महिलांना या हातामागामुळे घरातच उत्पन्नाचं स्रोत मिळालाय.
- अरुण निकम, भाग्यश्री निकमविणकर, वडगाव
मी बीई मेकॅनिकल आहे. कोरोनाकाळातच घर कोसळलं. तेव्हा कापसे फाउंडेशनने मदत केली नसती तर घर उभेच राहू शकलं नाही. मी दुसऱ्यांच्या कंपनीत काम करूनही पाहिलं. पण स्वतःच काहीतरी करण्याची इच्छा होती. मी कापसेंकडे गेलो. त्यांनी मला प्रोत्साहनच दिले. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज माझा स्वतःचा हातमाग असून, मी स्वयंपूर्ण आहे.
- सागर गोरख निकमहातमाग व्यावसायिक
माझी दोन्ही मुले कापसे फाउंडेशनमध्ये कामाला आहेत. बाळुभाऊ कापसेंनी मला फार मदत केली. त्यांनी मला राहायला छत दिले. त्यासाठी एक पै देखील माझ्याकडून घेतली नाही. तसंच दोन हातमागही दिले. मुले दिवसा फॅक्टरीत पैठणी विणतात आणि रात्री वेळ मिळाला की घरीही विणतात. त्यामुळे आज आमच्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान मिळतं आहे.
- शांताबाई नागपुरेविणकरांची आई
आम्ही इथे तीन महिन्याचे प्रशिक्षण देतो. त्यांना आधी शिकलेल्या विणकरासोबत बसवतो. पहिले दोन आठवडे ते फक्त काम पाहतात. नंतर काकडे काढणे वगैरे कामे ते शिकतात. एका मूकबधीर मुलाला शिकायला कमीतकमी तीन ते चार महिने लागतात. त्यांना त्यांच्या भाषेत शिकवणे हे आव्हान असते. आम्ही हे आव्हान आनंदाने स्वीकारतो, कारण त्यांना शिकवण्यात एक आंतरिक समाधान मिळतं.
- बापू मच्छिंद्र ढमालेपैठणी प्रशिक्षक
दीड दोन वर्षांपूर्वी आम्ही कापसे पैठणीसोबत जोडले गेलो. आमचं त्याआधीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य यात जमीनअस्मानाचा फरक आहे. इथे ज्या सुविधा आहेत, तशा सुविधा बाहेर कुठेच नाहीत. त्यामुळे दिवसातून तीन ते चार इंचाचे काम होते. आज आम्हाला घर मिळालंय, हाताला काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कामाचं समाधान आहे.
- सुनीता अंकुश वाघचौरेदिव्यांग विणकर
Previous
Next